- अन्यथा वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी व कार्यकारी अभियंत्यास करणार घेराव-
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आरमोरी / गडचिरोली -मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीने शेतकरी बांधवांचे कृषी पंपाचे व हल्ली ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे,गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित केला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधव व गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने जनसामान्यांच्या मनात ठसा उमटवणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल यांनी येत्या २४ तासात वीज वितरण कंपनीने खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत न केल्यास देसाईगंज, कुरखेडा व आरमोरी येथील वीज वितरण कंपनीच्या तालुका स्तरावरील उपकार्यकारी अभियंता व नंतर गडचिरोली येथील कार्यकारी अभियंत्यास २२ जुलै रोजी घेराव करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या स्थितीत शेतकरी बांधवांचे रोवणीची कामे सुरू आहेत. शेतकरी बांधवांची कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला गेला असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित केल्याने गावातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणची लाईट बंद स्वरूपात असल्याने हल्ली पावसाळ्याचे दिवसात सरपटणारे प्राणी, विंचू व इतर प्राण्यांमुळे अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायत स्तरावरील पाणीपुरवठा योजना व सार्वजनिक ठिकाणची वीज जोडणी चालू करण्याचे निर्देश दिले असून सुद्धा वीज वितरण कंपनीने अजून पर्यंत वीज जोडणी न केल्यामुळे संपुर्ण गावच्या गाव अंधारात आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीने येत्या २४ तासात खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर सुरुवातीला वीज वितरण कंपनीच्या तालुका स्तरावरील उपकार्यकारी अभियंता व नंतर जिल्हा स्तरावरील कार्यकारी अभियंत्यास घेराव घालु व आंदोलन करू असे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख भरत जोशी, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके यांनी म्हटले आहे.