मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
शेतकरी आणि सर्वसामान्यांची बँक म्हणून नावलौकिक असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वतःच्या जागेत स्थलांतरीत होणाऱ्या श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा शरद पवार,उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर रोजी श्रीवर्धन येथे संपन्न झाला.जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या नेत्यांना एकत्र आणून तटकरेंच्या मतदारसंघात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.सदर कार्यक्रम अगदी ठरलेल्या वेळेत सुरू झाल्यामुळे सुरुवातीला काही रिकाम्या खुर्च्यांकडे बघून उद्धव ठाकरेंनी सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आल्याचा भास झाल्याचं सांगताच उपस्थितांनी त्यांना मनमुराद दाद दिली.देशामध्ये माजलेल्या हुकूमशाहीला गाडण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.सुरुवातीला शेतकऱ्यांना चार टक्के व्याजाने कर्ज देणारी ही बँक आता शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज देत असल्याचं सांगतानाच बॅंकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अंतुलेंनी कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड असं केल्याचं सांगितलं.तोच धागा पकडून शिवकाळात गद्दारांना शिक्षा देण्यासाठी असलेल्या रायगड किल्ल्यावरच्या टकमक टोकावरून येणाऱ्या निवडणुकीत जनता आत्ताच्या गद्दारांचा कडेलोट करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.सत्ता येते तशी जाते पण सहकार क्षेत्रामधल्या व्यक्तींमधे सहकाराची प्रामाणिक भावना असली तर सर्वसामान्यांची प्रगती योग्य पद्धतीने होते असं प्रतिपादन शरद पवार यांनी केलं.त्याचप्रमाणे सत्तेसाठी जातीधर्मात फूट पाडण्याच्या षडयंत्राला आव्हान देण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन केल्याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.कधीकाळी केलेल्या मदतीची आठवण ठेवून आम्हाला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजकांचे आभार मानले.सदर सभेला सुभाष देसाई,अनंत गीते,रवींद्र वायकर, बबन पाटील,स्नेहल जगताप,अनिल नवगणे,पंडित पाटील,बाळाराम पाटील,तुकाराम सुर्वे,चित्रलेखा पाटील,मुस्ताक अंतुले आदि मान्यवरांबरोबरच बँकेचे सर्व अधिकारी,कर्मचारी आणि आजी-माजी संचालक उपस्थित होते.