अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव तालुक्यातील शिरपूर येथील रहिवासी असलेले स्व.संतोष एकनाथ भालेराव यांची कन्या डॉ.ऐश्वर्या भालेराव हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन एमबीबीएसची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या निमित्ताने अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रा. अरविंद गाभने व त्यांचे सहकारी पत्रकार बांधवांच्या वतिने आज डॉक्टर ऐश्वर्या भालेराव यांच्या राहत्या घरी सत्कार करण्यात आला. “प्रयत्नांती फळ “या ब्रीद वाक्य नुसार जर प्रयत्न करत राहिले ,तर फळ अवश्य मिळते. तिचे वडील स्व.संतोष भालेराव हे चहा ,पान टपरी चा व्यवसाय करत होते .परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती .तुटपुंज्या कमाईवर मुलीला डॉक्टर बनवावे , अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यानुसार डॉक्टर ऐश्वर्याच्या जिवणाच्या संघर्षाला सुरुवात झाली .ऐश्वर्याने प्राथमिक शिक्षण स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पूर्ण केले. नंतर अकरावी-बारावीचे शिक्षण अकोला येथे पूर्ण केले .त्यानंतर नीट परीक्षेत चांगले मार्क्स मिळाल्याने शासकीय कोट्यातून एमबीबीएस करिता नंबर लागला. परंतु एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असतानाच पितृछत्र हरविले .मात्र तिने न डगमगता प्रयत्नांची पराकाष्टा सुरूच ठेवली. आत्मविश्वास, प्रयत्न ,जिद्द ,चिकाटीच्या जोरावर एमबीबीएसची पदवी पूर्ण केली. यात तिच्या आईने व भावाने मोलाची साथ दिली .विशेष म्हणजे “माय भूमि हीच कर्मभूमी” या प्रमाणे तिला तिच्या माय भूमी मध्ये म्हणजे शिरपूर या ठिकाणी रुग्णाची सेवा करण्यासाठी 12 जुलै रोजी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये ती आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झाली . प्रतिकूल परिस्थितीवर यश प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अरविंद गाभने , प्रशांत लोखंडे ,विठ्ठल भागवत ,सुभाष बळी ,गजानन कुटे ,कपिल भालेराव ,गोपाल वाढे , सुलतान भाई , असलम पठाण, संदीप देशमुख ,शशिकांत देशमुख सह मराठी पत्रकार बांधव उपस्थित होते.