संजय भोसले
तालुका प्रतिनिधी ,कणकवली
प्रत्येक घरातील देवघराप्रमाणे पुस्तकांनी भरलेले ग्रंथघर असलेच पाहिजे. अवांतर वाचन केल्यानेच चांगला माणूस घडू शकतो. वाचन केल्याने माणूस संस्कारित होतो आणि सदविवेकबुध्दी जागृत होते, असे प्रतिपादन डॉ. अभिजित कणसे यांनी केले. तळेरे येथे आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दीन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अभिजित कणसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व वामनराव महाडिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा वाचनालयाचे उपाध्यक्ष राजू वळंजू, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, प्रा. हेमंत महाडिक, प्राचार्य अविनाश मांजरेकर, संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर, श्रावणी कंप्युटरचे सतीश मदभावे, प्रज्ञांगण च्या श्रावणी मदभावे, ध्रुव बांदिवडेकर, रेश्मा तळेकर, वाचनालयाच्या ग्रंथपाल साक्षी तळेकर, नांदलसकर आदी उपस्थित होते. यावेळी मुलांनी वाचनाचे महत्व विषद करणारे वक्तव्य तसेच, स्वरचित कविता सादर केल्या. यातून माणसाच्या आयुष्यात वाचनाला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित केले. यावेळी विभागीय स्तरावर निवड झालेल्या या प्रशालेच्या सिध्दार्थ जठार आणि साहिल पवार यांचा गौरव करण्यात आला. वाचन प्रेरणा दिना निमित्त दिवसभर मुलांना पुस्तके वाचता यावीत यासाठी स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अनेक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यानिमित्ताने अनेक मुलांनी या पुस्तकांची हाताळणी केली. यावेळी प्रा. हेमंत महाडिक, अजिंक्य तांबे, श्रावणी मदभावे, निकेत पावसकर, राजू वळंजू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अनेकदा आपण यशस्वी लोकांची आत्मचरित्रे वाचतो. मात्र त्यासोबतच अयशस्वी लोकांची आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. त्यांनी आयुष्यात केलेल्या चुका आपल्याकडून होणार नाहीत आणि त्यांच्या त्या प्रवासामधून आपल्याला नव्याने काहीतरी शिकता येईल, असे प्रतिपादन डॉ. अभिजित कणसे यांनी विद्यार्थ्यांना केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता सुर्वे यांनी, प्रस्तावना अविनाश मांजरेकर तर आभार एस. एन.जाधव यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक एन. तडवी, धनलक्ष्मी तळेकर, आशा कानकेकर आदी उपस्थित होते.


