दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : पावसाळा उलटून पंधरा दिवस देखील उलटले नसताना, जव्हार शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जव्हार नगर परिषदेने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे जव्हारच्या जय सागर धरणात मुबलक पाणी असताना सुद्धा जव्हार वासियांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.जव्हार शहरात सध्या २५१० इतक्या अधिकृत नळ जोडण्या आहेत. पाणी प्रश्नावर नागरीक वैतागले असुन या पार्श्वभूमीवर आज दि- १३ ऑक्टोंबर २०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माणीनी कांबळे यांची भेट घेण्यात आली. यावेळी शिवसेना विक्रमगड विधानसभा समन्वयक राजू अंभिरे यांनी जयसागर धरणावरून फिल्टर हाऊसला येणाऱ्या मेन लायनी मधून तसेच फिल्टर हाऊस वरून गावात असणाऱ्या गांधी चौक, सनसेट,पॉईंट, सूर्य तलाव येथील पाणीपुरवठ्याच्या टाक्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मेन लाईन वरून अनेक चोरट्या नळ जोडण्या दिल्यामुळे पाण्याच्या टाक्यांची लेवल होत नाही.टाक्या भरत नाही. त्यामुळे केवळ दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येते व पाणी टंचाई निर्माण होते ही बाब लक्षात आणून या सर्व अनाधिकृत नळ जोडण्याचा शोध घेऊन या अनाधिकृत नळ जोडण्या बंद कराव्या अशी मागणी करण्यात आली. तर शिवसेना शहरप्रमुख परेश पटेल यांनी जव्हार शहरातील गाडी वाशिंग सेंटर तसेच फिल्टर पाणी विक्रेते यांना व्यवसायासाठी चोरट्या पद्धतीने देण्यात आलेल्या नळ जोडण्या बंद मागणी केली. जव्हार नगर परिषदेमध्ये कायम पाणीपुरवठा कर्मचारी नसल्यामुळे कंत्राटी कर्मचारी चिरीमिरी घेऊन अनाधिकृत नळ जोडण्या देतात ही बाब देखील यावेळी मुख्याधिकारी माणीनी कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिली. अनाधिकृत नळ जोडण्या कट करताना कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक मध्ये येत असतील तर शिवसेना आपल्याबरोबर आहे, असे शिवसेना उपशहर प्रमुख आझर फरास यांनी सांगितले. जव्हार शहराला चार दशलक्ष घनमीटर प्रतिदिन पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणारी खडखळ नळ पाणी योजना गेल्या चार वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. तिचे काम करणारा ठेकेदार पळून गेला आहे. या योजनेच्या कामाला पुन्हा गती द्यावी अशी मागणी माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल पवार यांनी केली. यावेळी मुख्याधिकारी माणीनी कांबळे यांनी शिवसेना शिष्टमंडळाच्या सूचना लिहून घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला,तर एक महिन्यात पाणी प्रश्नावर सांगितलेल्या सूचनावर योग्यपणे कारवाई झाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला. या शिष्टमंडळात विक्रमगड विधानसभा समन्वयक राजू अंभिरे, शहरप्रमुख परेश पटेल, उपतालुका प्रमुख अर्शद कोतवाल, उपशहर प्रमुख आझर फरास, पप्पू सावंत, पतसंस्थेचे संचालक शकील कुनमाळी, असिफ घाची व आदी शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.