फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे अमली पदार्थ नियंत्रण (नार्कोटिक्स) विभागाने मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.ही कारवाई ७ व ८ ऑक्टोबरला पिंपळगाव तर्फे नारायणगाव व वडगाव सहाणी या गावच्या शिवेवर असणाऱ्या पत्र्याच्या शेड वर करण्यात आली आहे. सदर पत्रा शेड कोणाचे आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.दरम्यान कारवाईनंतर पत्रा शेड सील करण्यात आले आहे.
कारवाई बाबत मोठी गोपनीयता ठेवण्यात आली असून प्रसार माध्यमांनाही अद्याप या कारवाई बाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी शेडमध्ये ड्रग्स तयार करण्यात येत होते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणाहून सुमारे २६ किलो अल्प्राझोलम व इतर कच्चा माल सापडला आहे.अल्प्राझोलम हा पदार्थ मानसिक विकारांमध्ये वापरला जात असून गुंगीकारक असल्याचे तज्ज्ञांकडून समजते.शेडचा वापर करणारे व्यक्ती फरार झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.ग्रामीण भागातील एका छोट्या गावात नार्कोटिक्स विभागाने केलेल्या या कारवाईने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.काही महिन्यांपूर्वी ओझर फाटा येथे स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाच्या पथकाने जुन्नर येथील एका तरुणास मेफेड्रोन नावाची पावडर विकताना पकडले होते.दरम्यान,नुकतीच नार्कोटिक्स विभागाने नाशिक येथे एका कारखान्यावर कारवाई करत सुमारे ३०० कोटींचा मेफेड्रोन साठा जप्त केला आहे त्यातच ड्रग रॅकेट आरोपी ललित पाटील नुकताच ससून रुग्णालयातून पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला आहे.यासंबंधित काही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.त्यामुळे या प्रकरणाचा जुन्नरच्या या कारवाईशी संबंध असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.