प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
देवळाली प्रवरा – ११ ऑक्टो २३
प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी थांबवून ४०० रूपये पाणी पट्टी कमी करावी आदी प्रमूख मागण्यांसाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर आसूड मोर्चा व ठिय्या आंदोलन करणेत येणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, व देवळाली प्रवरा नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हंटले.
निवेदनावर आप्पासाहेब ढूस यांचेसह प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, मेजर महादेव आव्हाड, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित, उपाध्यक्ष अशोक देशमुख, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष गणेश भालके, देवळाली प्रवरा महिला शहर अध्यक्ष भाग्यश्री कदम, उपाध्यक्ष आशा माळी, राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, उपाध्यक्ष वंदना कांबळे, अफसाना सय्यद, प्रहार श्रमिक सेवा संघाचे शहर प्रमुख – नवनाथ चव्हाण, प्रहार चे संघटक – सुनील कदम, प्रकाश वाकळे, शरद खांदे प्रभाकर कांबळे, प्रसाद नगर शाखाप्रमुख अमोल साळवे, उपप्रमुख सनी सोनवणे, सलीम शेख – जिल्हा सल्लागार प्रहार दीव्यांग संघटना, युवा शाखेचे ओंकार मुसमाडे, अमित शेख, समर्थ मिसाळ, सागर सोनवणे आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने देवळाली प्रवरा नगरपरिषदेला कर्ज उपलब्ध करून देऊन मुळा धरणातून जवळपास १७.६० कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना सुरू करून दिली आहे. या योजनेच्या धरणातील जॅकवेल जवळ पाण्याचे मीटर बसविण्यात आले असून त्या मीटरच्या रीडिंग प्रमाणे पातबंधारे विभागाकडून देवळाली प्रवरानगर परिषदेला पाणीपट्टीची आकारणी केली जाते. सदर पाणीपट्टी तसेच या योजनेसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि या योजनेसाठी लागणारे विजेचे बिल हे देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांच्या पाणीपट्टी व तत्सम करा मधून येणाऱ्या पैशातून भरले जाते.
तथापि देवळाली प्रवरा हद्दीतील काही राजकीय मंडळींनी स्वतःचे दक्षिणेतील राजकारण निश्चित करण्यासाठी मुळा धरणातून येणाऱ्या या नळपाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनवर मुळा धरणापासून ते देवळाली प्रवरा हद्दीपर्यंत ठीक ठिकाणी म्हणजे जवळपास बारा ठिकाणी असलेल्या एअर व्हॉल्वला एक इंच आकाराचे होल पाडून त्यावर सर्विस स्याडल बसून तेथील नागरी वस्तींना तसेच खाजगी व्यक्तींना २४ तास पूर्ण दाबाने मोफत पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्याचे सर्व व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध आहे.यामध्ये काही नागरिकांच्या थेट घरामध्ये नळजोड दिलेले असून, काही नागरिकांच्या शेताला या नळामधून पाणी दिल्या जाते, तसेच काही ठिकाणी खुले स्टॅन्ड पोस्ट तयार करण्यात आले आहेत, तसेच या बारा नळांमध्ये काही नळ हे जाणीवपूर्वक एअर व्हॉल्व लीक ठेवून तयार करण्यात आले आहेत.
यातील एक नळजोड देवळाली प्रवरानगर परिषदेने ठराव करून थेट राहुरी नगरपालिकेच्या घनकचरा डेपोला वृक्ष लागवड करण्यासाठी काढून दिलेला आहे. राहुरी नगरपरिषदेला या मुख्य लाईनवर पूर्ण दाबाने २४ तास पाणी दिल्या जाते त्याची पाणीपट्टी मात्र देवळाली प्रवरामधील नागरिकांच्या कंट्रोल लाईनवर आकारल्या जाणाऱ्या घरगुती पाणीपट्टी प्रमाणे आकारणी करण्यात येते. त्याचप्रमाणे पातबंधारे विभागाकडून मीटरने पाणी घेणाऱ्या देवळाली प्रवरा नगरपरिषदेने ठराव करून बिगर मीटरने राहुरी नगरपरिषदेला पाणी देण्याची बाब देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांना कायदेशीर वाटत नाही, त्यामुळे हा ठरावच मुळात बेकायदेशीर झालेला असून तो ज्यांनी केला त्यांच्याकडून या राहुरी नगरपरिषदेची पाणीपट्टी वसूल करणे गरजेचे आहे.त्यामुळे देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांचा या पाण्याच्या उधळपट्टीला पूर्णतः विरोध असून प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने व येथील नागरिकांच्या वतीने पाण्याची उधळपट्टी थांबविण्यासाठी आम्ही आपणाकडे खालील मागण्या करिता संदर्भीय पत्राद्वारे निवेदन देऊन त्या मागण्या मान्य कराव्यात ही विनंती केली होती. तथापी आपण एक महिना उलटूनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. म्हणून, खालील मागण्यासाठी आम्ही १९ ऑक्टोबर २०२३ रोजी देवळाली प्रवरानगर परिषदेवर आसूड मोर्चा व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करत असून कृपया आमच्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात ही विनंती.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे..
(१) मुळा धरण ते देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दी पर्यंत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनवर जोडलेल्या सर्व अनधिकृत जोडची चौकशी करून दोशींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, (२) या मुख्य पाईपलाईनवरील सर्व अनधिकृत नळजोड तात्काळ बंद करण्यात यावेत, (३) मुळा धरण ते देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीपर्यंत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईन असलेले सर्व अनधिकृत नळजोड बंद केल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेची होणारी पाण्याची बचत आणि विजेची बचत पाहता नागरिकांवर सन २०१४-१५ नंतर वाढविण्यात आलेला पाण्याचा भार.. म्हणजे, पाणीपट्टीची आकारणी ४००/- रुपयांनी कमी करावी.
(४) राहुरी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास दिलेल्या नळ जोडला पाण्याचे मीटर बसविण्यात यावे, व राहुरी नगरपरिषदेकडून त्या मीटर प्रमाणे पाणीपट्टी वसूल करण्यात यावी. तसेच ज्यांनी ठराव करून हा नळजोड दिला आहे त्यांच्याकडून मीटर प्रमाणे होणारी येथून मागील पाणीपट्टी वसूल करण्यात यावी, (५) देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ पाणीपुरवठा करावा.वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसमवेत सनदशीर मार्गाने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. भव्य आसूड मोर्चा व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी कृपया आमच्या वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रहार च्या या आसूड मोर्चा व ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रसंगी आप्पासाहेब ढूस केले.