रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड : येथील ग्रामपंचायत सदस्य वसिम बेग मिर्झा यांनी नागरिकांकरिता आधार कार्ड अपडेट, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, मतदान कार्ड, दुरुस्तीबाबत चार दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भरभरून प्रतिसाद दिला. वार्ड क्रमांक दोन मधील इंदिरा नगर, भाऊदेवराव गिऱ्हे नगर परिसरातील राहणाऱ्या हजारो नागरिकांना याचा फायदा झाला. दि. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊन शिबिर यशस्वी केले. एवढेच नव्हे तर कुणबी व मराठा प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वीस हजार रुपये किमतीचे संगणक डिप्लोमा कोर्स सुद्धा मोफत शिकविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य वसीम मिर्झा यांनी स्पष्ट केले. सदर डिप्लोमा कोर्स चे प्रशिक्षण प्राध्यापक मयूर लहाने यांच्या आकांक्षा टायपिंग अँड कॉम्पुटर इन्स्टिटयूट मध्ये देण्यात येईल. मोफत शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य वसीम बेग मिर्झा, उमर बेग मिर्झा, व वार्ड क्रमांक दोन मधील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिराला गावातील अनेक मान्यवर भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यापुढे सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सदैव अग्रेसर राहील अशी ग्वाही वसीम बेग मिर्झा यांनी दिली.