संजय भोसले
तालुका प्रतिनिधी कणकवली
कणकवली : सिंधुदुर्ग चर्मकार समाजोन्नती मंडळाने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अखंड सातत्य ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरती आपल्या समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप ही त्या विद्यार्थ्याला भविष्यात प्रेरणा देणारी असते. समाज बांधव म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी यथाशक्ती सहकार्य करणे हे मी माझे कर्तव्य समजतो . “शिकलो तरच या जगात आपण टिकलो”. हा मूलमंत्र लक्षात ठेवून यश मिळवण्यासाठी नेहमी झटत रहा.मी स्वत्ःला उद्योजक नंतर पण आधी चर्मकार समाज बांधव आहेअसे समजतो. समाजाप्रती माझे दायित्व पार पाडणे हे महत्त्वाचे आहे .यापुढेही समाज उन्नतीसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील. असे प्रतिपादन शिरवळ गावचे सुपुत्र ,मुंबई येथील युवा उद्योजक संजय चव्हाण यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ, कणकवली कणक नगर येथील ,शिवशक्ती मंगल कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक संजय चव्हाण ,समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण ,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, एडवोकेट अनिल निरवडेकर, उदय शिरोडकर ,तालुका सचिव अविनाश चव्हाण, एस टी को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर प्रवीण मापनकर ,केशव पावसकर ,शरद जाधव ,चंदू भोसले ,सत्यविजय जाधव ,आनंद जाधव ,सुंदर जाधव,तळेरे पंचक्रोशीचे संजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण, महेंद्र चव्हाण, मंगेश साळसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक संजय चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास ,छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ,यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुजित जाधव म्हणाले की, जिल्ह्याचे ।’संत रविदास समाज भवन ‘ दृष्टिक्षेपात असून दिमाखदार तीन मजली इमारत उभारली जात आहे .यासाठी 80 लाखांचा भरीव नीधी आणण्यासाठी जिल्हा संघटना मेहनत घेत आहे. या समाजभवनात स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करणार आहोत .समाज संघटनेच्या माध्यमातून पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये चर्मकार समाजाच्या अनेक संघटना असल्या तरी संत रविदास जयंती गतवर्षीप्रमाणे चर्मकार समाज या एका झेंड्याखाली सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे .कणकवली तालुक्यातील, कणकवली शहरातील समाज भवन उभारणीचे स्वप्न लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेत असल्याचे जाधव म्हणाले. तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण म्हणाले की यश संपादन करून आई-वडिलांचे नाव उज्वल केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार केला असला तरी या यशात त्यांच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. आज ज्या यशवंत विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश मिळवून आई-वडिलांचे नाव उज्वल केले आहे. भविष्यात कठोर मेहनत घेऊन परीक्षांना सामोरे जा. आत्मविश्वासाने स्पर्धेला तोंड द्या. यश तुमचेच आहे .कष्ट केल्याशिवाय यश कधीच मिळणार नाही .विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम हे एक निमित्त आहे .या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्रित बांधणे आणि विचारांची देवाण-घेवाण होणे हे अतिमहत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात आपले करिअर निर्माण करताना जीवनात यशस्वी झाल्यानंतर आपल्या समाजाकडे निश्चितच वळून बघावे. ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात द्यावा. जिल्ह्याचे नियोजित संत रविदास समाज भवन निर्मितीच्या कार्यात सर्व समाज बांधवांनी यथाशक्ती आर्थिक सहकार्य करावे. असे आवाहनही महानंदा चव्हाण यांनी यावेळी केले. यावेळी मार्गदर्शन करताना कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले की समाज संघटित झाला असला तरी ,आपण प्रगती करतोय काय? याचे सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. कणकवली तालुका चर्मकार समाज संघटना या पातळीवर नेहमीच उजवी ठरली आहे. कणकवली तालुक्यातील चर्मकार समाजातील युवा पिढी हिरीरीने समाजकार्यात सहभागी होत आहेत .ही एक जमेची बाजू आहे .मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजाकडे राजकीय सत्ता स्थाने असणे आवश्यक आहे .जिल्ह्यात आठ सरपंच चर्मकार समाजाचे आहेत. जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन तरी आणि पंचायत समितीमध्ये चार जागा तरी अनुसूचित जागेसाठी राखीव असून त्या जागांवर चर्मकार समाजाचे प्रतिनिधी असावेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रास्ताविक सत्यविजय जाधव यांनी केले, सूत्रसंचालन अविनाश चव्हाण यांनी केले ,तर आभार शंकर चव्हाण यांनी मांडले.


