संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली.
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ या शाळेमध्ये ‘स्वछता ही सेवा’ या अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या २ ऑक्टोबर या जयंती दिनाचे औचित्यसाधून सदरची स्वछता मोहीम शालेय परिसरात राबविण्यात आली होती. सदर मोहिमेच्या दिवशी सर्व प्रथम म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मराठी – इंग्रजी अशा भाषांमध्ये आपापले वक्तृत्व कौशल्य सादर केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी देखील आपले अध्यक्षीय भाषण सादर केले. सदरच्या अध्यक्षीय भाषणात राजेश जाधव यांनी म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिभावान व्यक्तिमत्व, उच्च विचारसरणी, प्रभावशाली सामाजिक कार्य व बहुमूल्य योगदान यांबाबत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर सर यांनी सादर केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ. पाटील मॅडम यांनी सादर केले.या कार्यक्रमानंतर ‘स्वछता ही सेवा’ या अभियानांतर्गत शालेय परिसर स्वछता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थी, पालक शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समिती कार्यकारणी सदस्य, लोकप्रतिनिधी इ. सहभागी झाले होते.