प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी , नांदगाव:
नांदगाव : पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकात पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी करण्यात येवून नायब तहसीलदार चेतन कोनकर यांना पत्रकार संरक्षण कायदा अधिक कठोर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, पत्रकारांवरील हल्ल्याची जलद न्यायालयात सुनावणी करण्यात यावी, आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना धमक्या, शिवीगाळ केली गेली. मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केला गेल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायद्याची भितीच समाजकंटकांच्या मनात उरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडांकरावी त्यांच्यावर हल्ला चढविला. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणाऱ्या गुंडांवर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही. पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील ७५ टक्क्यांवर हल्ले राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकत्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेले आहे. मग अशा प्रकरणात राजकीय हस्तेक्षप होतात आणि पोलीस, पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एन.सी. दाखल करून हा विषय बंद करून टाकतात असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत. हे थांबले पाहिजे. आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. सरकारकडे आमच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत. पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याची कलमं लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, जेणेकरून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल. दुसरी मागणी अशी आहे की, पत्रकारांवरील हल्ल्यांचे सर्व खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत जेणेकरून पत्रकारांना न्याय मिळू शकेल. पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरूवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण अध्यादेशाची होळी करीत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागते आहे ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब नाही असे शेवटी म्हटले आहे. यावेळी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, जेष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.










