प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी संत झेवीयर्स विद्यालय, तर तिसरे बक्षीस छत्रे विद्यालयाच्या संघाने पटकावले. स्पर्धेत गुरू गोविंदसिंग इंग्लिश मिडीयम स्कूल, सरस्वती विद्यालयाच्या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १० शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. इंडीयन हायस्कूलच्या लोकमान्य सभागृह येथे ही स्पर्धा पार पडली. दुपारी स्पर्धेला सुरुवात झाली. विविध संघ, तबला, हार्मोनियम, ड्रम आदी वाद्यांसह हजर झाले. मालेगाव येथील गायक आसिफ शेख, राजेश पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संविधान पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात होते. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे अध्यक्षस्थानी होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, अशोक परदेशी, साहित्यिक संदीप देशपांडे, सोमनाथ घोंगाणे ,संजय मोरे, नरहरी उंबरे, सतिश शेकदार आदी उपस्थित होते. अध्यक्ष अमोल खरे यांनी मनोगतात पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. पोलिस निरीक्षक थोरात यांनी पत्रकार संघाने राबवलेल्या या समाजोपयोगी स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत शहराची सांस्कृतिक ओळख झालेल्या पत्रकार संघाने यासारखे विधायक उपक्रम अव्याहत सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष कार्याबद्दल अशोक बिदरी, संदीप देशपांडे, गणेश केदारे, आम्रपाली वाघ आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेची सुरुवात ‘यह प्रीत याहा की रीत सदा….’ या गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांनी संपूर्ण सभागृह देशभक्तीरसात न्हाऊन निघाले. ‘जय हिंद…’, ‘ये धरती हिंदुस्तान की….’, ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा…’, ‘ही माय भूमी आमची…’, ‘ए वतन तेरे लिये…’, ‘सतरंगी रंगो से प्यारा…’, ‘जयोस्तुते जयोस्तुते…’, या आणि अन्य विविध गीतांनी, संगीत शिक्षक, विद्यार्थी, पालक श्रोते मंत्रमुग्ध झाले. काही स्पर्धकांना पहिल्यांदाच मंचावर गायनाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विजयी संघांना आकर्षक ट्रॉफी, रोख रकमेसह सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपाली परदेशी यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. निलेश वाघ, उपाली परदेशी, अशोक बिदरी, नाना अहिरे, गणेश केदारे, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, अनिस शेख, प्रज्ञानंद जाधव, रामदास सोनवणे, राजू लहिरे, अनिल आव्हाड, तुषार गोयल, प्रिया परदेशी, रुपाली केदारे, नैवेद्या बिदरी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आनंद बोथरा यांनी आभार मानले.