संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
ऐन पावसाळ्यात स्त्रीपात्र वठवणाऱ्या पुरुष लोककलावंताची (दशावतारी) अनोखी हळद मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या साक्षीने युट्यूबवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत प्रणय शेट्ये लिखित, बॉस स्टुडिओ निर्मित ‘गाजली हलद’ हे गाणे Boss Studio या यूट्यूब चॅनेलवर रिलीज केले जाईल. कोकणातील दशावतार या सुप्रसिद्ध नाट्यपरंपरेतील स्त्रीपात्र वठवणाऱ्या पुरुष लोककलावंतांच्या लग्नासंबंधित प्रश्न हा वेगळाच विषय यानिमित्तानं चर्चिला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिडवणे गावचा सुपुत्र संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये यांचे हे गीत असून प्रथमच त्यांनी या गीतांमधून दिग्दर्शन करणार आहेत. विविध लोकप्रकारात स्त्रीपात्र अगदी चाल, लकबीसह हुबेहुब सादर करणाऱ्या दिग्गज लोककलावंतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. याच परंपरेत कोकणातील दशावतारी स्त्रीपात्र कलाकारांचा देखील समावेश होतो. या कलाकारांतील एका स्त्रीपात्र वठवणाऱ्या कलाकाराचं लग्न जमलं असून त्याचे दशावतारी मित्र ती हळद कशी गाजवतात, या कलाकाराच्या कलेवर एका तरुणीचं प्रेम कसं जडतं, प्रेमाची व्याख्या असं भावविश्व या गाण्यातून उलगडणार आहे. या गाण्यात नीलकंठ सावंत आणि ऋतुजा राणे या कलाकारांचा समावेश आहे. यावेळी गाण्याबद्दल भावना व्यक्त करताना, ‘कोकण कोकण’ हे गीत ऐकलं होतं. यानंतर प्रणयने ‘गाजली हलद’ या गाण्याची संकल्पना ऐकवली. त्यातील वेगळेपण जाणवताच याची निर्मिती बॉस स्टुडीओंतर्गत करण्याचे ठरवले.’ असं निर्माते पंकज शाह म्हणाले.हे हळदीचे गाणे जसराज जोशी, शुभांगी केदार, सार्थक कल्याणी , नागेश मोरवेकर यांनी गायन केले आहे. तसेच सिनेमॅटोग्राफर म्हणून चिन्मय जाधव याने जबाबदारी पार पाडलीय. विशेष म्हणजे, दिग्दर्शन क्षेत्रात देखील प्रणय शेट्येनं यानिमित्ताने पदार्पण केलं आहे. या गीताचं चित्रिकरण कुडाळ, सावंतवाडी, कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले असून यासाठी नेरुरच्या सुधीर कलिंगण कलेश्वर दशावतार मंडळातील कलाकारांनी मार्गदर्शन आणि सहाय्य केले आहे.सामाजिक प्रश्नाला कलेचा आवाज! (चौकट) एका वर्षांत ८ महिन्याहून अधिक काळ स्त्रीपात्राचं काम करत असताना दैनंदिन आयुष्यात या पुरुष कलाकारांच्या देहबोलीत काहीअंशी ते स्त्रीपात्र डोकावत राहतं. अशावेळी या लोककलावंतांची लग्न जमताना अनेकदा उशीर होत असल्याचं लक्षात येतं. नेमक्या याच मुद्द्याला नजरेसमोर ठेवत द्रौपदी क्रिएशनचे प्रणय शेट्ये यांनी प्रेम देहावर नाही कलेवर नि कलाकारावर करा असा संदेश देणारं ‘गाजली हलद’ हे गीत लिहिलंय आणि संगीतबद्ध केलंय.यानिमित्ताने कलेला वाहून घेतलेल्या विशेषतः स्त्रीपात्र वठवण्याचं धाडस करणाऱ्या कलावंतांचं न कळणारं, न सांगता येणारं दुःख जवळून जाणून घेता येणार आहे.









