किरण नांदे
शहर प्रतिनिधी, ठाणे
२८ जुलै व ६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण निवड व फिंन्सस्विमिंग राष्ट्रीय जलतरण निवड चाचणी मध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी बक्षीसांची लयलूट केली आहे. तसेच या जलतरणपटूंची १६ ते २३ ऑगस्ट २०२३ रोजी भुवनेश्वर ओरिसा व बालेवाडी पुणे येथे ३ ते ५ सप्टेंबर यादरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या चाचणीत झालेल्या जलतरण स्पर्धेत १० वर्षे वयोगटात निधी सामंत हिने सुवर्णपदक तर फ्रेया शहा हिने रौप्यपदक पटकाविले. फिंन्सस्विमिंग जलतरण स्पर्धेत ११ वर्षे वयोगटात युवराज राव याने सुवर्ण तर तृणांश गंद्रे यांनी १ रौप्यपदक प्राप्त केले. ११ वर्षे वयोगटात फ्रेया शहा हिने ४ सुवर्णपदक, श्रुती जांभळे हिने २ रौप्य व १ कांस्य तर माही जांभळे हिने ३ कांस्यपदक पटकाविली. तर १२ वर्षे वयोगटात परीन पाटील याने ४ सुवर्ण, आयुष तावडे याने १ सुवर्ण, सोहम पाटील याने १ रौप्य तर आयुषी आखाडे हिने २ रौप्य व २ कांस्यपदके पटकाविली. १४ वर्षे वयोगटात सोहम साळुंखे याने ४ सुवर्णपदके प्राप्त केली. तर १८ ते २५ या वयोगटात श्रवण पेठे यांनी २ सुवर्णपदकासह १ कांस्यपदक पटकाविले.या सर्व जलतरणपटूंचे ठाणेकरांकडून कौतुक होत असून हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रिडा अधिकारी मीनल पालांडे, तरणतलाव उपव्यवस्थापक रवी काळे यांनी देखील जलतरणपटूंचे कौतुक केले आहे.

