अनंता टोपले
तालुका प्रतिनिधी मोखाडा
मोखाडा : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात सामील होऊन सत्तेत सहभागी होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना या चर्चा केवळ अफवा व खोट्या असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी दिली आहे. काल दिवसभर आणि रविवारी सकाळी सिल्वर ओकला दहा वाजेपर्यंत होतो. त्यानंतर दुपारी नेहरू सेंटर येथे महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होतो. संध्याकाळी पुन्हा आम्ही शरद पवार साहेब यांच्या घरी सिल्वर ओकला होतो. रात्री दीड दोन वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. मी जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे असे आम्ही होते. त्यामुळे जयंत पाटील आमच्यासोबत असताना सकाळी जाऊन अमित शहांना भेटले, या विधानात तथ्य नाही, ही चर्चा खोटी आहे, असे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.