प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
ज्ञानाचे मंदिर असणाऱ्या शाळेच्या परिसरात काही व्यसनाधीन युवक शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या वेळी दारू व इतर नशेच्या पदार्थाचे सेवन शाळेच्या आवारात करत आहेत. नशा पाणी करणाऱ्या व्यसनाधीन युवकांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी संस्था अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी यांनी पाथरी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरातील गुलशन नगर भागात शब्बीर अन्सारी एज्युकेशन सोसायटी पाथरी संचलित अबू अयुब अन्सारी उर्दू प्राथमिक शाळा आहे. शाळेची वेळ संपल्यानंतर रात्रीच्या वेळी शाळेत कोणी नसल्याचा फायदा घेत काही व्यसनाधीन युवक मागील काही दिवसापासून या शाळेच्या इमारतीच्या पायऱ्यावर बसून गुटखा, सिगारेट, गांजा, व दारूचे सेवन करतात. गुटखा खाऊन शाळेच्या सर्व पायऱ्यावर व भिंतीवर थुकून शाळेच्या भिंती खराब केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील विद्युत पुरवठा बोर्ड ही फोडण्यात आला आहे. तर अनेक वेळा या ठिकाणी दारूच्या व बिसलरीच्या रिकाम्या बाटल्या आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे शाळेच्या भिंतीवर कोळशाच्या साह्याने एकट्याला पण वाचताना लाज वाटेल अशा शिवीगाळ व अश्लील चित्र रेखाटण्यात येत आहेत. याबाबत अनेक वेळा या भागातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पालक यांची सभा घेऊन याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यावर अद्यापही आराम बसला नाही. शाळा आहे शिक्षणाचे व ज्ञानाचे मंदिर आहे. या ठिकाणी येऊन असे कृत्य करणे योग्य नाही. त्यामुळे सदरील व्यसनाधीन युवकांचा बंदोबस्त करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी यांनी देखील निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे.