सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण,
उरण: महावितरण कंपनीकडून महाराष्ट्रातील विज ग्राहकांची दिवसेंदिवस लुटमार सुरू असून ग्राहकांच्या विज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे विज बिल भरता भरता विज ग्राहकांची दमछाक होते.जर प्रत्येक युनिटला दिल्लीमध्ये २.५०, हरियाणा २.५०, हिमाचल प्रदेश २.७५, तर महाराष्ट्रत ७.०० रुपये युनिट विज दर का ? मग महाराष्ट्रातील विज हे सोन्याच्या तारांमधून येते काय? असा संतप्त सवाल विज ग्राहकांकडून केला जात आहे. उघड डोळे, बघा निट. असे बोलण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील विज ग्राहक एकत्रित येऊन आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे विज ग्राहकांकडून बोलले जात आहे. महावितरण कंपनीकडून दिवसेंदिवस भरमसाठ विज बिले वाढवली जात असून याचा फटका सर्वसामान्य विज ग्राहकांना बसत आहे. त्यामध्ये स्थिर आकारामध्ये दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. २०१५ साली स्थिर आकार ४० रुपये होता. तो आठ वर्षानी ११६ वर गेला असून तो तिप्पट वाढला आहे. यामध्ये दरवर्षी मिटर भाडे याची अतिरिक्त रक्कमही विज ग्राहकांना भरावी लागत आहे.पहिल्या तीन महिन्यांनी येणारे लाईट बिल हा एक महिन्यांनी येत असून तेही तिप्पट येत आहे.कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवायला लागल्या असून दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये कमवणे कठीण झाले आहे. सहा ते साठ हजार रुपये कमवणाऱ्या सर्वसामान्य माणसाला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे यातच भरीत भर म्हणून ३०० रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आता ११०० रुपये वर गेला आहे. ईतर जीवनावश्यक वस्तुच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या खुर्चीसाठी गुंतले असून त्यांना जनतेसाठी काही देणेघेणे नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे. यासाठी आंदोलन करण्यात यावे. असे ग्राहक वर्गातून बोलले जात आहे.


