शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
नांदुरा: तालुक्यातील शेंबा,टाकरखेड परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाने पेरलेल्या जवळपास सर्वच कपाशीच्या वानावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुभाव झाल्याने शेकडो एकर जमिनीवरील कपाशीचे झाडे लाल पडून वाळत असून पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे, काही शेतकऱ्यांनी पिकांवर हजारो रुपये खर्च केले तरी सुद्धा कपाशीचे पीक सुधरत नाहीये, सदर कपाशी पिकावर आलेल्या या रोगामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कपाशी पडून आहे. कपाशीच्या दरात वाढच न झाल्याने इतक्या दिवसांपासून सांभाळून ठेवलेली कपाशी कमी दरातही विकता येत नसल्याने शेतकरी चांगले अडचणीत सापडले आहेत.बियाणे, खते, किटकनाशके, शेतीची मशागत, मजुरी यावर मोठा खर्च झालेला आहे. तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करण्याची गरज आहे व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.