सुरज वाघुले
शहर प्रतिनिधी, श्रीरामपूर
टाकळीभान : येथील ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून सदर योजनेसाठी रुपये १ कोटी ९९ लाख ६४ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर योजनेचे अंदाजपत्रक तयार करतांना त्यात वॉटर फील्टर प्लॅन्टचा समावेश केलेला नाही. पाणी पुरवठ्यासाठी उद्भव हा टाकळीभान टेलटँकचे विहीरीचा धरण्यात आलेला असून उन्हाळ्याचे दिवसात या विहीरीत पाणी नसते. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी अनेक वेळेस सदरचा टेलटँक हा पाण्या अभावी कोरडा राहिलेला आहे. टेलटँकचा पाण्याचा उद्भव हा कायमस्वरुपी नाही.टाकळीभान गावची लोकसंख्या ३० हजार इतकी असून सदर पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारा साठवण तलाव हा ग्रामपंचायतीचे जागेत (गावतळ्यात) होऊ शकेल, त्यामुळे या योजनेच्या साठवण तलावासाठी नव्याने जागा संपादित करावी लागणार नाही व त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शासनास खर्च करावा लागणार नाही. सदरचे साठवण तलाव भंडारदरा धरणाचे पाण्याने प्रत्येक आवर्तनाचे वेळेस भरला जाईल त्यामुळे पाण्याचा उद्भव (Source) हा शाश्वत राहिल. याबरोबरच नागरीकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी योजनेत वॉटर फिल्टर प्लॅन्टचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
तसेच टाकळीभान – पिंपळगाव रस्ता आणि टाकळीभान कमान ते घुमनदेव कॉर्नर पर्यंत दुभाजक आणि स्ट्रीट लाईट सहित रस्त्याची मागणी तसेच नव्याने झालेल्या नेवासा श्रीरामपूर रस्त्यावर पथदिवे बसविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वरील सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत खासदार सदाशिव लोखंडे यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. याबद्दल खासदारांचे समस्त गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले. अशी माहिती ग्राम.सदस्य मयूर पटारे यांनी दिली.यावेळी शिवाजी शिंदे, दत्तात्रय नाईक, बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, विलास दाभाडे, यशवंत रणनवरे, मोहन रणनवरे, टाकळीभानचे ग्रामविकास अधिकारी आर.एफ जाधव उपस्थित होते.


