महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.३:- भद्रावती शहरात कडक लाॅकडाऊन चालू असल्याने देशी-विदेशी दारु सहज मिळणे कठीण झाल्याने गावठी दारुचा महापूर आल्याचे भद्रावती पोलिसांना माहित होताच त्यांनी नजिकच्या बरांज तांडा परिसरात धाड टाकून ४१ लाख ९० हजाराचे गावठी दारुचे साहित्य नष्ट केले. प्राप्त माहितीनुसार, राज्यात लाॅकडाऊन सुरु होताच भद्रावती शहरात अवैध मार्गाने मिळणा-या देशी-विदेशी दारुचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे अनेक तळीरामांनी आपला मोर्चा नजिकच्या बरांज तांडा वस्तीत मिळणा-या गावठी दारुकडे वळविला. त्यामुळे बरांज तांडा परिसरात जंगलाच्या आस-याने गावठी दारु गाळणारांचे मोठे पिक आले. ही बाब पोलिसांना माहित होताच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील सिंग पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पो.शि. केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान आणि शशांक बदामवार यांनी दि.२६ ते २८ एप्रिलपर्यंत बरांज तांडा परिसरात विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत गुळ दारु, गुळ सडवा आणि गुळ दारु गाळण्याचे साहित्य असा एकूण ४१ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जागीच नष्ट केला.
.