दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद : दि-11 कोरोनाचा नवीन व्हेरियंट डेल्टा प्लसला रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील बाजारपेठेवर वेळेचे निर्बंध घातले. त्यामुळे कुठेतरी मागील महिन्याभरापासून सुरळीत होणारा व्यापारावर परिणाम झाला आहे. सततच्या बंद व वेळेचे निर्बंधांमुळे व्यापारी तसेच कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे शासनाने अंत न पाहता बाजारपेठेवरील निर्बंध हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी रविवारी (ता.११) केली आहे. श्री.काळे म्हणाले की, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बाजारपेठेच्या वेळा वाढून देण्यात आल्या आहे. मात्र, शहरात अजूनही वेळेच्या बाबतीतील संभ्रमचा कायम आहे. शासनाने व्यापाऱ्यांचा अंत पाहू नये.
याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन संभ्रम दूर करावा. औरंगाबाद पर्यटनाची राजधानी म्हणून शहराकडे पाहिले जाते. येथे व्यापार वाढीसाठी संधी निर्माण करून देणे व त्यासाठी पोषक वातावरण असणे गरजेचे आहे. बाजारपेठेवरील निर्बंधाच्या व वेळेच्या संभ्रमावस्थेमुळे चुकीचा संदेश जात आहे. कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या व प्रशासनाच्या प्रत्येक नियमावलीचे पालन करून शासनाची मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत करणे गरजेचे होते. त्या उलट व्यापाऱ्यांनीच शासनाकडे वीज बिलात सूट, मालमत्ता करामध्ये सूट, आर्थिक पॅकेज याची मागणी वेळोवेळी केली. त्याचा पाठपुरावा सातत्याने करत आहे. मात्र, शासन व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करित आहे. व्यापाऱ्यांना व्यापार करण्याची संधी आपण देणार की नाही, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही प्रकारच्या करांमध्ये सूट देणार नाहीत, कोणतेही आर्थिक पॅकेज मिळणार नाही, मग व्यापाऱ्यांनी व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे? त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांचा अंत न पाहता निर्बंध हटविण्यात यावे, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष म्हणाले.