मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच सर्व मेडिकल कॉलेजांची आणि संलग्न रुग्णालयांची मासिक कामगिरी पाहून रँकिंग देण्यात आले आहे. त्यासाठी काही निकष ठरविण्यात आले असून त्यात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अव्वल ठरले असून मुंबईतील ग्रँट मेडिकल (जेजे रुग्णालय) कॉलेज दुसऱ्या क्रमांकावर तर सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचा तिसरा क्रमांक आला आहे. यापुढे दर महिन्याला रँकिंग ठरणार असल्यामुळे आता प्रत्येक कॉलेजला दर महिन्याला कामाचा हिशेब शासनाला सादर करावा लागणार आहे. याकरिता त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. सर्व महाविद्यालयांना कोणत्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील याचा नमुना यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण विभागाकडून देण्यात आला होता. त्या प्रश्नांची उत्तरे दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ई-मेलद्वारे सादर करावी लागणार आहेत. यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मे महिन्यातील कॉलेजची माहिती प्राप्त झाल्यानंतर कक्षातील अधिकारी यांनी सर्व माहितीचे विश्लेषण करून रुग्णालयांचे रँकिंग करण्यात आले.