सुरेश म्हेत्रे
ग्रामीण प्रतिनिधी श्रीगोंदा
अहमदनगर जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव असणारा सिद्धटेकचा नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती या ठिकाणी आज संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे मंदिर चालु झाल्यापासून ते संध्याकाळी मंदिर बंद होईपर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्या कारणामुळे आज भाविक सिध्दीविनायक गणपती चे दर्शन घेणे साठी येत होते.मंदिर परिसर हा दिवसभर भाविक भक्तांनी गजबजुन गेला होता. येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते. उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोवळे फार कठिण असते. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे.सिद्धटेक हे गाव भीमा नदी तीरी वसलेले असल्यामुळे या ठिकाणी येणारे भाविक भक्त तसेच पर्यटक हे बोटिंग चा देखील आनंद घेत असतात.