“दिनांक ६ डिसेंबर १९५६”
बाबासाहेबांच्या अकस्मात मृत्यूची बातमी उभ्या हिंदुस्थानात आणि सर्व जगभर दुपारपर्यंत पोहोचली. भारतातील दलितवर्गातील लहान-थोर लोक “दुखाने व्याकुळ” झाले. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, पंजाब वगैरे लांबच्या पल्ल्यावरचे लोक मुंबईला बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेण्याकरता रेल्वेने आले.
मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यातील लोकही मोठ्या प्रमाणात आले होते. बहुतेकांनी मृत्यूची बातमी कळताच भांबावलेल्या स्थितीत स्टेशन गाठले व मिळेल त्या गाडीने, मिळेल त्या डब्यात, फूटबोर्डवर उभे राहून, डब्याच्या वरच्या भागावर (टपावर) बसून मुंबईला येऊ लागले.रेल्वे स्टेशनवरील प्रचंड जनसमुदाय पाहून रेल्वे अधिका-यांनी बाबासाहेबांच्या अनुयायांना प्रवासात शक्य तेवढे साहाय्य केले.नागपूर, मनमाड, मिरज वगैरे स्टेशन पासून स्पेशल रेल्वेगाड्या सोडल्या. मुंबईच्या दादर स्टेशनवर उतरून लोकांच्या झुंडीच्या झुंडी एकसारख्या राजगृहाकडे येत होत्या.
बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस विमानाने येत आहे, ही बातमी मुंबईतील लोकांना कळली तेव्हा लोकांचे थवेच्या थवे विमानतळाकडे जाऊ लागले, दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले. वाटेत नागपूर येथील लोकांनी नऊ ते बारा (रात्री) असे तीन तास बाबासाहेबांना मूक वंदना साश्रुनयनांनी व भारावलेल्या अंतकरणांनी दिली. विमान तेथून निघून सांताक्रूझ विमानतळावर रात्रौ १-५५ दिनांक ७ ला उतरले.विमानातील लोकांपैकी शंकरानंद शास्त्री वगैरे काहीजण राजगृहावर सरळ अगोदर जाऊन आले. विमानतळावर पंचवीस-तीस हजार लोक जमा झाले होते.देह अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आला. अॅम्ब्युलन्स २-२५ वाजता विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हातात हार घेऊन व डोळ्यांतून अश्रूंना वाट करून देत उभे होते, काहींनी हातात कंदील आणले होते. काहींनी गॅसबत्त्या तर काहींनी रॉकेलच्या दिवट्या आणल्या होत्या. लोकांची वंदना घेत घेत अॅम्ब्युलन्स हळूहळू चालत राजगृहाला ४-३५ वाजता आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला, “बाबा” आणि ते असहाय्यपणे रडू लागले.
बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला अनेक संस्थांचे व त्यांच्या चाहत्यांचे हजारो हार अर्पण करण्यात आले. मुंबईचे महापौर श्री मिरजकर हार अर्पण करून गहिवरून ओरडले “बाबासाहेब! दलितांचे राज्य स्थापनेच्या अगोदरच निघून गेलात!”‘ रावबहादूर सिताराम केशव बोले’ हे हार अर्पण करण्यास ८.२५ ला आले. हार बाबासाहेबांच्या चरणावर ठेवून त्या 85 वर्षाच्या वृद्ध सहका-याने “बाबासाहेबांच्या देहाला मिठी मारली” व ते मोठ्यांदा रडू लागले. प्राध्यापक जोशी तर हार अर्पण करून बाबासाहेबांच्या “पायांना मिठी मारून” ,ओक्साबोक्शी रडू लागले.’दलित स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको! मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोके आपटली. कित्येक जणी निश्चित पडल्या. त्यांना स्वयंसेवकांनी प्रथमोचार केले व बागेत नेऊन बसवले.
हिंदू कॉलनीतील लोकांनी “आमच्या वसाहतीतील ज्ञानियांचा राजा गेला”आमच्या हिंदू कॉलनीचे “भूषण” हरवले असे उद्गार काढले.शुक्रवार दिनांक सात ला दुपारी एक वाजता बाबासाहेबांचा पार्थिव देह शृंगारलेल्या ट्रकवर उंच आसनावर ठेवला त्यांना दिल्लीहून ज्या सुटात आणले होते त्याच पोशाखात ट्रकवर उच्चासनावर ठेवण्यात आले. गळ्याभोवती मफलरही तसाच गुंडाळलेला होता.ट्रक सव्वा वाजता राजगृहाकडून हलला. महा यात्रेला आरंभ झाला. त्या प्रेतयात्रेत पुढे व मागे मिळून “सुमारे दहा लाख लोक अश्रू गाळीत” आणि बौद्ध धर्माचे “त्रिशरण” हुंदके देत म्हणत चालले होते.
एका शृंगारलेल्या ट्रकवर पुष्पहारांखाली झाकलेला *बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला होता. त्या मागे भगवान बुद्धाची मूर्तीही ठेवण्यात आली होती, त्या शेजारीच त्यांच्या पत्नी माईसाहेब, पुत्र श्री. यशवंतराव व पुतणे श्री. मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल तरी असावी. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या *”बंडखोर सुपुत्राचे* अंतिम दर्शन घेण्यासाठी महायात्रेच्या मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही.डॉक्टरांचे शव व्यासपीठावर ठेवल्यानंतर त्यांच्या डोक्याजवळ त्यांचे पुत्र ‘यशवंतराव’ मध्ये हातात बुद्धाची प्रतिमा घेऊन श्रीमती माईसाहेब व पुतणे श्री. मुकुंदराव हातात जळल्या मेणबत्त्यांच्या थाळ्या घेऊन उभे राहिले व बुद्ध भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला. ते करुण दृश्य पाहतांना अनेकांच्या डोळ्यांतून अश्रु वाहत होते.सर्व भिक्खूंनी दोन्ही क्षेपणावरून“नमो तस्स भगवतो” ही प्रार्थना, तीन “सरण” व “पंचशील” यांचा जमावाकडून संध्यासमयीच्या या प्रशांत वातावरणात उच्चार करून घेतला. तेव्हा अधिकच गांभीर्य निर्माण झाले.यानंतर चंदनाच्या चितेवर चढविलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली.
भारतातील सात कोटी दलित जनतेचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहाला साक्षी ठेवून आज सायंकाळी दादरच्या चौपाटीवर अत्यंत शांत व गंभीर वातावरणात सुमारे दोन लक्ष लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व त्यानंतर बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला. डॉक्टरांच्या शवाला अग्नी देताच त्यांचे आप्त व स्वकीय यांना संयम आवरता आला नाही. तें चितेकडे धावले. “ओक्साबोक्सी रडू लागले व त्यांनी पुन्हा एकवार “बाबां” चे शेवटचे दर्शन घेतले. चितेवर कापूर व तूप घालण्यात आल्यामुळे ज्वाला उफाळल्या व बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.विश्वरत्न, ज्ञानयात्री, संसदपटू, इतिहासकार, कायदेपंडित, उच्च विद्याविभूषित, बोधीसत्व, किमयागार, ज्ञानसूर्य, संपादक, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन


