सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा या गुन्ह्यांच्या आलेखामध्ये नेहमीच चढ-उतार राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत १० हजार ४०४ गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद झाली आहे. यातील ३ हजार १०२ गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले होते. रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, वाहने असा जवळपास ५३ कोटी ४ लाख ४७ हजार ३६६ रुपयांच्या ऐवज सराईत गुन्हेगारी टोळ्यांनी लुटला. अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून १९ कोटी २ लाख ५४ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरी त्या तुलनेत ते उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. अनेक गुन्हेगार नवीन आहेत. ते रेकॉर्डवर नाहीत. परराज्य व परजिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही गुन्हेगारी टोळ्या येथे येऊन गुन्हे लगेच गायब होतात. परिणामी त्यांची माहिती पोलिस यंत्रणेला लागत नाही. विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे घडल्यानंतर तपासाची मदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ठेवली जाते. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची मदत कित्येकदा मोलाची ठरत आहे.
सर्वाधिक घरफोडीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर लोकांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागत आहे. अनेकदा लोकांचा निष्काळजीपणा चोरट्यांना चोरी करण्यासाठी निमंत्रण ठरत आहे. जिल्ह्यात २५ पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज कुठे ना कुठे चोरीचा प्रकार घडतोच. पोलिस ठाण्यात केवळ गुन्हे दाखल करण्याचे काम केले जाते. दैनंदिन कामाचा व्याप असल्याने त्यांच्याकडून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागच चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावतो. सातत्याने हा विभाग तपासात असतो. जिल्हा पोलिस दलाचे खबऱ्यांचे नेटवर्क कमी झाले आहेत. जुने खबरे वयस्कर झाले आहेत. नवीन खबरे तयार होताना दिसत नाही. या सर्व अडचणींचा पोलिसांना सामना करावा लागत आहे. अनेक पोलिस ठाण्यात नवीन पोलिस कर्मचाऱ्यांची भरती आहे. गुन्हेगार व त्यांची गुन्ह्याची पद्धत याची माहिती त्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. त्यामुळे वाढते चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल.


