अमरावती : व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवून इलेक्ट्रिक बिल पेंडीग असल्याची बतावणी करत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना टोपे नगर येथे उघडकीस आली. एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगत वृद्धाच्या बॅक खात्यातून तब्बल 78 हजार 84 रुपयांची रक्कम परस्पर लंपास केली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, किशोर बाबाराव देशमुख (70, रा. विदर्भ हाऊसिंग कॉलनी, टोपेनगर) यांच्या व्हॉटसअॅपवर मेसेज आला. त्यामध्ये इलेक्ट्रिक बील पेंडीग आहे, त्वरीत बिल भरा, अन्यथा आपले वीज कनेक्शन कट केले जाईल, असे नमूद होते. त्यानंतर वीज बिल पूर्ण भरले आहे, असे किशोर देशमुख यांनी सांगितले. परंतु आमच्या सिस्टीममध्ये दाखवित नाही. त्यासाठी क्विक सपोर्ट टिम व्हीवर अॅप डाऊनलोड करा, असे किशोर देशमुख यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी अॅप डाऊनलोड केले, त्यावेळी त्यांना 100 रुपये भरण्यास सांगण्यात आले. परंतु त्यानंतर त्यांच्या बॅक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून 78 हजार 84 रुपयांची रक्कम पेटीएमच्या माध्यमातून काढून घेतल्याची बाब देशमुख यांच्या निर्देशनास आली. किशोर देशमुख यांनी सायबर ठाणे गाठून चौकशी केली असता, त्यांच्या बॅक खात्यातील पैसे क्रिष्णाकांत प्रजापती (रा. दंडीडीह, गिरीडीह, झारखंड), संतोष प्रसाद शाव (रा. अनंता हरिमित्र रोड, नेडियारपारा, नादिया, पश्चिम बंगाल) व सुधिरदास कानाईदास (रा. कोलकत्ता, पश्चिम बंगाल) यांच्या खात्यात वळती झाली असल्याचे सांगण्यात आले.