लोणकर कुटुंबाला आणि अशा अनेक स्वप्नील ला न्याय देण्याची मागणी.
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी/गडचिरोली – स्वप्निल लोणकर हा विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा 2019 मध्ये यशस्वी पास झाला होता. परंतु त्याला नोकरीवर रुजू करण्यासाठी ची मुलाखत मागील अडीच वर्षांपासून रखडलेली होती. घरची हालाखीची परिस्थिती आणि त्यात शिक्षणासाठी काढलेले कर्ज व बेरोजगारी या सर्वाला कंटाळून अखेर स्वप्निल ने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून संस्थागत खून आहे असा आरोप भारतीय विद्यार्थी मोर्चाने केला असून लोणकर कुटुंबाला तसेच अशा अनेक स्वप्नीलला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे चामोर्शीचे तहसीलदाराद्वारे मुख्यमंत्र्याना केली गेली आहे.
स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांच्या परिवाराला त्वरित एक कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देण्यात यावे, परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होत नसल्याने परीक्षार्थी विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन फक्त परीक्षेची औपचारिकता न करता पदावर रुजू करण्यासाठी अंमलबजावणी करावी आणि भरती पूर्ण होईपर्यंत सरकारने यामध्ये लक्ष देऊन पाठपुरावा करावा, सर्व शासकीय रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, कोरोना च्या काळात केजी पासून ते पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे व विद्यार्थी निराश अशा कक्षेत जाऊन आत्महत्या करीत आहेत असे होऊ नये म्हणून सरकारने शिक्षण व्यवस्था सुरळीत करावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले असून सदरील सर्व मागण्या सर्व विद्यार्थ्याकरिता महत्त्वाचे आहेत आणि त्या पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे असे नमूद करण्यात आले आहे. सदरील सर्व मागण्या पूर्ण करण्यास सरकार जर हलगर्जीपणा करीत असेल किंवा अपयशी ठरत असेल तर विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येईल याची सर्व जबाबदारी सरकारची असेल असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चा कडून करण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थी मोर्चा, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष संघशिल बावणे, भारतीय विद्यार्थीनी छात्र प्रकोष्ट, गडचिरोली जिल्हा संयोजक दीक्षा बांबोडे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे पदाधिकारी अशोक गजभिये उपस्थित होते.











