पुणे : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून या कार्यक्रमात सहभाग घेवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज केले. महाराष्ट्र कॉस्मो पॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज आणि २१४- विधानसभा कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आझम कॅम्पस पुणे येथे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित मतदार नोंदणी विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, उपजिल्हाधिकारी तथा २१४ विधानसभा पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी सुभाष भागडे, तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुनील शेळके, महाराष्ट्र कॉस्मो पॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष अबेदा इनामदार, सचिव इरफान जे. शेख आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, भारत निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांसह समाजातील दिव्यांग, तृतीयपंथी, वंचित घटक यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात येत आहे. शहरी भागात मतदान कमी प्रमाणात होते, त्याचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. १७ ते २९ वयोगटातील युवकांचे मतदार यादीत कमी प्रतिनिधित्व असून ते वाढणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने सायकल रॅलीच्या माध्यमातून पुणे येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. भारत निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. यावर्षी ८ डिसेंबर २०२२ पर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. युवकांनी स्वत:च्या मतदार ओळखपत्राला आधार जोडणी करुन घेण्यासह कुटुंबातील सदस्यांनाही आधार जोडणीसाठी प्रोत्साहित करावे. सुदृढ लोकशाहीसाठी मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करावा. मतदार यादीत आपले नाव नोंदवणे व मतदानात भाग घेणे हे आपले कर्तव्य आहे. महाविद्यालयातील १७ वर्षांच्या पुढील सर्व वयोगटातील युवकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी विशेष करून शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.