मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२५) फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाचा जामीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने तेलतुंबडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. एनआयएच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवड्यासाठी स्थगिती दिली होती. दरम्यान, तेलतुंबडे यांना जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा विरोधात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेलतुंबडे यांच्यावर भीमा कोरेगाव प्रकरणात बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी एनआयएच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.25) सुनावणी घेण्याचे मान्य केले होते.
1 जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंसाचार उसळला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला असून 10 पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. भीमा-कोरेगाव संघर्षानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान पोलिसांनी 162 जणांवर 58 गुन्हे दाखल केले होते. एप्रिल 2020 मध्ये तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. आनंद तेलतुंबडे सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होते. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी त्यांनी केलेल्या याचिकेत 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषणही केले नव्हते, असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आनंद तेलतुंबडे यांच्यावर कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्याशी संबंध असल्याच्या आरोप आहे. त्यांना एप्रिल २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेशी तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा संशय तपासयंत्रणेला होता. एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणी नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.


