जळगाव : पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरणगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारावे, अशी मागणी केली असता सदर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याबरोबरच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. पाळधी गावात 50 खाटांचे ट्रॉमा सेंटर, पाळधी पोलीस स्थानक, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य उद्यानाची उभारणी करणे, असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उभारणे, तसेच इतर विकास कामांसाठीदेखील सर्वतोपरी आर्थिक मदत करण्यात येईल. तसेच कोळी समाजाचे प्रश्नदेखील प्राधान्याने सोडविले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले