अमरावती : बडनेरा येथील स्थानिक नारायणराव राणा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाद्वारे आधार कार्ड व मतदार ओळखपत्र जोडणीविषयी नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी आधार कार्ड व मतदान कार्ड लिंकिंगचे महत्त्व जाणून घेतले. निवडणूक आयोगाने आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे गरजेचे केले आहे. राज्यात 1 ऑगस्टसून त्याच्याशी संबंधित कॅम्पेन सुरू झाले आहे. मतदारांची ओळख पटवणे आणि मतदार यादीमधील नावांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. यासाठी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाद्वारे मतदार ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी करिता मतदार जनजागृती अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार संदीप टांक, संजय आवारे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश मुंदे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक संजय टांक यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने मतदार नोंदणी कशी करावी, फॉर्म नंबर 16, 17 व 18 च्या संदर्भात संपूर्ण माहिती देवून आधार कार्ड व मतदार ओळखपत्र जोडणी विषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैराळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतः नोंदणी व मतदार ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी करा व त्याचबरोबर इतरांचेही करून देण्यास मदत करा, असे आवाहन केले. संजय आवारे यांनीही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता भांगडिया-मालनी यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले, तसेच विद्यार्थ्यांनी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी कशी करावी हे शिकून कमीत कमी एका विद्यार्थ्यांनी दहा नागरिकांचे करून द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती कांडलकर व आभार वैष्णवी धर्माळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. खुशाल अळसपुरे, प्रा. डॉ.अंजली चेपे, प्रा. डॉ.कल्पना मेहरे, प्रा. डॉ. हर्षल निंभोरकर, प्रा. सतीश खोडे, प्रा. मनीष भडांगे, प्रा. हेमंत बेलोकार, प्रा. माधुरी मस्के व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.