चंद्रकांत श्रीकोंडवार
जिल्हा प्रतिनिधी, भंडारा
भंडारा : एडीआयपी आणि वयोश्री योजना अंतर्गत शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींचे मुल्यांकन करून त्यांना कृत्रिम अवयव आणि आवश्यकत्या साहित्याचा पुरवठा करण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात खा. सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक 20 सप्टेंबर पासून या शिबिरांना सुरुवात होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि दोन्ही जिल्हा स्थानावर हे शिबिर घेतले जाणार आहे.केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत होत असलेल्या या शिबिरात शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव मोफत देण्याच्या दृष्टीने अशा व्यक्तींचे मूल्यांकन केले जाणार आहे. कृत्रिम अवयव देण्यासाठी आवश्यक असलेले मोजमाप करून गरजवंतांचे मूल्यांकन करीत ही मदत केली जाणार आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जवळपास 5000 साहित्याचे वाटप गरजवंतांना करण्यात येणार आहे. तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या, काठी, कृत्रिम अवयव, कॅलिपर्स, तसेच अंध व्यक्तींना आवश्यक असलेले साहित्य या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या दृष्टीने संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील 13 तालुक्यांमध्ये मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा आणि गोंदिया या जिल्हा स्थळी सुद्धा हे शिबिर घेतले जाणार आहे. 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात दिव्यांग बांधवांनी नोंद करून आवश्यक त्या साहित्याच्या दृष्टीने मूल्यांकन करून घ्यावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.
या शिबिराच्या नियोजनाच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घेण्यात येणाऱ्या शिबिराच्या तारखा निश्चित करून त्या दृष्टीने प्रशासनाने कारवाई करण्याचे निर्देश खासदारांनी दिले.