खामगाव : नवरा दारूच्या आहारी गेला की संसाराचा बट्टयाबोळ ठरलेला. दारुड्या नवऱ्यासोबत रहायला कोणत्या बायकोला आवडेल? मात्र तरीही त्या बिचारीने त्याच्यावर विश्वास ठेवला. आज सुधरेल, उद्या सुधरेल असे तिला वाटत होते. एकदा त्याला कंटाळून ती माहेरी आली मात्र जेव्हा त्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चांगले वागण्याचा आणि वागवण्याचा शब्द दिला तेव्हा तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. पण शब्द पाळेल तो बेवडा कसला. त्याच्यातला राक्षस पुन्हा जागा झाला अन् त्याने पुन्हा तेच केलं. अखेर आता वैतागून तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पिडीत विवाहिता सध्या तिच्या माहेरी शहापूर येथे राहते. २०१६ मध्ये तिचे लग्न झाले होते. तिला एक चार वर्षांचा आणि एक सव्वा दोन वर्षांचा असे दोन मुले आहेत. लग्नानंतर सुरुवातीचे सहा महिने नवऱ्याने चांगले वागवले मात्र नंतर दारूच्या नशेत मारहाण करू लागला. तरीही तिने कसाबसा संसार केला. २०२० मध्ये तिच्या नवऱ्याने मारझोड करून तिला घराबाहेर हाकलले. माहेरी येऊन तिने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यानंतर तिच्या नवऱ्याने सासुरवाडीत येऊन १०० रुपयाच्या स्टॅम्पवर चांगलं वागण्याचा व वागविण्याचा शब्द दिला. विवाहिता सासरी नांदायला गेल्यावर तिचा नवरा पुन्हा दारू पिऊ लागला. त्याने तिला दुकानावर उधारीत किराणा आणायला पाठवले. मात्र आधीची उधारी न दिल्याने ती किराणा आणू शकली नाही. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलले. या सगळ्या प्रकाराला सासू सासऱ्यांच्या पाठिंबा होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह सासू सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.