महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : वेकोलिने भद्रावती तालुक्यातील तिरवंजा(मोकासा) परिसरातील जमीन अधिग्रहित न केल्याने तिरवंजावासिय जनतेत असंतोष निर्माण झाला असून जमीन अधिग्रहित करण्यात यावी अशी मागणी तिरवंजा ग्राम पंचायतीचे उपसरपंच प्रशांत कोपुला यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. प्रशांत कोपुला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, वेकोलि प्रशासनाने तिरवंजा ( मोकासा ) येथील जमीन अधिग्रहितत न केल्याबद्दल वेकोली प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
वेकोली चंद्रपूर ने भटाळी वेकोलिच्या विस्तारीकरणासाठी मौजा चेकतिरवंजा ( १२१.३४ हे ), पायली भटाळी ( १४ ९ .४२ हे ), चिंचोली ( १ ९ ७.७ ९ हे ), किटाळी ( ४२.१३ हे ) या गावातील जमीन अधिग्रहित केली. परंतु वेकोलि वाहतुकीचा मुख्य मार्ग असलेल्या व भटाळी वेकोली च्या लगत असलेल्या वेकोलि भटाळी चा सर्वात जास्त त्रास असलेल्या मौजा तिरवंजा ( मोकासा ) येथील एकही एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही. त्यामुळे तिरवंजा ( मोकासा ) येथील नागरिकांमध्ये वेकोली प्रशासना बद्दल रोष निर्माण झालेला आहे. वेकोलिच्या उत्खननाचे वेळी निघणारी ओ. बी. ( ओव्हर बर्डन ) माती ही तिरवंजा गावाला लागलेली आहे. त्यामुळे तिरवंजा गावाच्या सभोवताल जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे जंगली हिंस्त्र प्राणी हे गावात येतात. परिणामी गावात नेहमी भीतीचे वातावरण असते. वेकोलि भटाळीची ओ. बी. ( ओव्हर बर्डन ) माती ही जंगलाच्या दिशेने वाढत असल्याने जंगलातील गवत खाणारे सर्व जनावरे ही तिरवंजा येथील शेतीत घुसून शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान करीत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांत वेकोलि भटाळी प्रशासना विषयी रोष निर्माण झाला आहे.
दि.७ सप्टेंबर रोजी तिरवंजा (मोकासा) येथील वेकोलि लगत असणाऱ्या उर्वरित जमीनी सुध्दा अधिग्रहित कराव्या या मागणीसाठी उपसरपंच प्रशांत कोपुला यांच्या नेतृत्वात गावातील नागरिक व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ मुख्य क्षेत्रीय महाप्रबंधक वेकोली क्षेत्र, जिल्हा चंद्रपूर यांना भेटून या विषयावर सविस्तर चर्चा केली.यावेळी ग्रामपंचायत तिरवंजा ( मोकासा ) अंतर्गत येत असलेल्या उर्वरित जमिनी व वेकोलि भटाळी लगतच्या सर्व जमिनी वेकोली प्रशासनाने अधिग्रहित कराव्या व गावातील बेरोजगार युवकांना वेकोलि भटाळी मध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशी मागणी करण्यात आली. तिरवंजा ( मोकासा ) येथील नागरिकांना वेकोलीच्या ओ. बी. ( ओव्हर बर्डन ) मातीमुळे कोणताही त्रास राहणार नाही व त्यांनाही इतर गावांप्रमाणे कायस्वरूपी रोजगार प्राप्त होईल. याकरिता वेकोली प्रशासनाने प्रयत्न करून मौजा तिरवंजा येथील वेकोलि लगतची सर्व शेतजमीन अधिग्रहित करावी अशी मागणी करण्यात आली. जर मागणी पूर्ण झाली नाही, तर वेकोलि प्रशासना विरुद्ध मौजा तिरवंजा येथील सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशाराही यावेळी प्रशांत कोपुला यांनी दिला.











