कराड : सांगली येथील पाच जणांच्या सराईत टोळीला उंब्रज पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीने उंब्रज येथे महामार्गापासून जवळ असलेल्या सैनिक बँकेच्या रोडलगत असणारी एक शॉपी फोडून सुमारे १० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल लंपास करून त्याच्या शेजारी असणारे संगणकाचे दुकान फोडले होते. ही घटना गुरुवारी (दि. १) पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारे घडली. घटनेबाबत समजताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, उंब्रज पोलिसांनी पळून निघालेल्या पाच संशयितांना पकडून संशयितांकडून कटावणीसह धारधार शस्त्रे हस्तगत केले. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. रात्रीची गस्त घालणा-या पोलिस पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली असून त्यांचे वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी कौतुक केले. पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांच्या टोळीत सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील संशयित आहे. त्यांच्यावर खून, मारामाऱ्या, दरोडे, हाफ मर्डर यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.