पारगाव : टोमॅटोच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात टोमॅटो तोडण्याची कामे सुरू आहेत. कांद्याचे दरही घसरलेले असल्याने शेतकरी अतिशय अडचणीत आले आहेत. टोमॅटोच्या क्रेटला (20 किलो) अवघे शंभर रुपये बाजारभाव मिळत आहे. टोमॅटो पिकासाठी गुंतविलेल्या भांडवलाच्या तुलनेत हा बाजारभाव परवडणारा नाही. सध्या या परिसरात टोमॅटो तोडणी सुरू आहे. परंतु, बाजारभाव समाधानकारक मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरीवर्गात मात्र नाराजीचे वातावरण दिसत आहे. तालुक्यात पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर आदी गावांमध्ये पावसाळी हंगामात टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी घेतले आहे. परंतु, यंदा अतिपावसाचा फटका टोमॅटोबागांना बसला आहे. पावसामुळे टोमॅटोबागांवर विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव झाला. ते आटोक्यात आणण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी टोमॅटो पिकावर करावी लागली.