मोहन चुन्ने
तालुका प्रतिनिधी लाखांदूर
लाखांदूर : मोठया वडिलांचे अस्थी विसर्जनासाठी गावातीलच नातेवाईकांसोबत गेलेल्या एका 39वर्षीय इसमाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची व्र्हदयदावक घटना दि. 27/8/22रोजी तान्हया पोळ्याचे दिवशी सकाळी 8चे सुमारास लाखांदूर तालुक्यातील तावशी चुलबंद नदी घाटावर घडली. मृतक इसमाचे नाव धनराज एकनाथ शेंडे वय 39 वर्ष रा. तावशी ता. लाखांदूर जि. भंडारा असे आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक इसमाचे मोठे वडील शंकर मारुती शेंडे यांचे वृद्धापकाळाने 13 दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या निमित्ताने अस्थी विसर्जनासाठी गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांसोबत धनराज गावाशेजारील चुलबंद नदीवर गेला होता. रीती रिवाजाप्रमाणे मुंडन करण्यासाठी म्हणून नदीपात्रात केस ओले करण्यासाठी उतरला. मात्र त्या ठिकाणी खोल डोह असल्याने व पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने सदर इसम पाण्याचे प्रवाहात वाहून गेला. त्याला उपस्थित असलेल्या दोन ग्रामस्थांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ झाले.घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे व दिघोरी चे ठाणेदार हेमंत पवार यांनी ताफा लावून आफतकालीन बोट आणून नदीपात्रात शोधकार्य सुरु केले. दिवसभर शोधकार्य करून मृतकाचे शोध न लागल्याने रात्री उशिरा शोधमोहिमेला पूर्णविराम देण्यात आला. दुसऱ्या दिवशी स. 8 वाजता घटनास्थळापासून जवळपास 3 कि. मी. अंतरावरील पाथरी चुलबंद घाटावरील नदीपात्रात लावलेल्या जाळ्यात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. ऐन तान्हा पोळ्याचे दिवशी अचानक घडलेल्या घटनेमुळे गाव शोकमग्न झाले होते. दिघोरी पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला असून ठाणेदार हेमंत पवार यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.


