वाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या महाबळेश्वर च्या खाजगी दौऱ्यावर आज रात्री येणार आहेत.पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यानिमित्त महाबळेश्वर मुक्कामी येणार आहेत. शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या खाजगी रिसॉर्टवर येथे शुक्रवारी रात्री त्यांचे आगमन होणार आहे ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीदिनी शक्ती स्थळावर अभिवादन केल्यानंतर ते महाबळेश्वरसाठी निघाल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थे साठी सहा वरिष्ठ पोलीस अधिकारी व पन्नास पोलीस कर्मचारी बंदोबस्थसाठी महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी झाल्यावर पावसाळी अधिवेशनाआधी प्रथमच आपल्या जन्मगावी दरे येथे एक दिवससाठी आले होते. मात्र एका दिवसाच्या विश्रांतीनंतर ते तातडीने मुंबईला रवाना झाले. आता पुन्हा एकदा विश्रांती निमित्त ते सहकुटुंब महाबळेश्वर येथे दाखल होणार आहेत. अद्याप त्यांच्या कार्यक्रमांची माहिती मिळू शकली नसली तरी हा संपूर्ण खासगी दौरा असल्याची माहिती मिळत आहे .यामुळे कोणत्याही शासकीय बैठका होणार नसल्याचे सातारा प्रशासनाकडून सांगण्यात आले.