मुंबई : मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे, कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. केदार शिंदे सोशल मीडियावर सक्रिय असतात. बऱ्याचदा ते राजकीय मतं ठामपणे मांडत असतात. रोखठोक मतांसाठी ते जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते धार्मिक देखील आहेत. श्रीस्वामी समर्थ यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाच्या संहितेची पूजा दादर येथील स्वामींच्या मठात केली आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
ज्यात ते असं म्हणतात की, महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या संहितेची पुजा श्री स्वामी समर्थ महाराज मठ दादर येथे केली. आपण कष्ट करतो. त्याला साथ तुम्ही रसिक प्रेक्षक गर्दी करून देता पण, महत्वाचा आशिर्वाद हा त्या शक्तीचा असतो, जी शक्ती बुद्धी शक्ती देते. माझी नितांत श्रद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांवर आहे. त्यांच्या आज्ञेने आणि इच्छेनेच मी कार्य करू शकतोय…. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.