महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणा-या लोकसेवा मंडळातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य यंदाच्या स्वातंत्र्य दिनी मिसाबंदी स्वातंत्र्य सैनिक व गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक यांचा विद्यालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मिसाबंदी स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव गुंडावार, मनोहरराव पारधे, विवेक सरपटवार, स्व.बाबुराव लांबे यांचे सुपुत्र शरद लांबे, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक स्व.श्रीधरराव पद्मावार यांच्या अर्धांगिनी कमलताई पद्मावार, लोकसेवा मंडळाचे सहसचिव नामदेवराव कोल्हे, सदस्य अमित गुंडावार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशालता सोनटक्के मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व मिसाबंदी व गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी सर्पमित्र श्रीपाद बाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे, गीत, नृत्य सादर करण्यात आली. तसेच सत्कार मूर्ती बळवंतराव गुंडावार यांनी आपल्या भाषणातून कशा प्रकारे आणिबाणी लादण्यात आली व कशा प्रकारे विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. याची सविस्तर माहिती समजावून सांगितली. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश उमाटे यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशालता सोनटक्के यांनी केले. संचालन विशार गावंडे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. आकोजवार यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.