लग्न म्हणजे आनंद सोहळा असतो. या सोहळ्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींना आवर्जून आमंत्रण दिलं जातं. त्यामुळे त्या सोहळ्याची रंगत आणखी वाढते. नातेवाईक मित्रमंडळी एकत्र आल्याने वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नाचगाणं, हेवेदावे, कपडे, जेवण असं बऱ्याच गोष्टी लग्न सोहळ्यात पाहायला मिळतात. लग्न सोहळा लक्षात राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. असंच एका महिलेने तिच्या लग्नासाठी ऑफिसमधल्या 70 जणांना आमंत्रण दिलं होतं. पण लग्न सोहळ्याला त्यापैकी एकीनेच हजेरी लावली. त्यामुळे निराश झालेल्या वधूने तडकाफडकी राजीनामा दिला. संबंधित प्रकार चीनमधला असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. महिलेने ऑफिसमधल्या तिच्या एक तृतीयांश सहकाऱ्यांना आमंत्रित केले होते. लग्नाच्या दोन महिने आधी तिने आमंत्रण दिलं होतं. मात्र, जेव्हा तिच्या लग्नाचा दिवस आला तेव्हा तिला धक्काच बसला. काही जण सोडले तर बाकीचे सर्वजण लग्नाला पोहोचतील अशी तिला आशा होती, पण तसं काही झालंच नाही. वधूच्या आमंत्रित केलेल्या 70 साथीदारांपैकी फक्त एकच जण आली होती. लग्नात आलेली सहकारी तिची सल्लागार होती. ऑफिसचे मित्र न आल्याने लग्नात त्यांच्या जेवणाची नासाडी झाली. एवढेच नाही तर जेवण फेकून देण्याची वेळ आली. यामुळे कुटुंबीयांनी खरीखोटी सुनावली त्यामुळे ती खूप निराश झाली. त्यामुळे वधुने टोकाचं पाऊल उचलत नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे जर कुणी तुम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलं तर आवर्जून जा. जर शक्य नसेल तर आगाऊ सूचना द्या जेणेकरून जेवणाची नासाडी होणार नाही.