पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीने एका व्यक्तीसोबत ठेवलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सासूने सुनेचे मुंडके छाटून हत्या केल्याची घटना समोर येत आहे. आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
गुरुवारी एक महिला तिच्या सुनेचे मुंडके हातात घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचली, आणि पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायचोटी येथील कोठाकोटा रामापुरम भागात राहणाऱ्या सुब्बम्मा यांनी अनैतिक संबंध व संपत्तीच्या वादातून सून वसुंधरा हिची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठत आत्मसमर्पण केले.
पोलीस अधीक्षक (एसपी) हर्षवर्धन राजू यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मालमत्तेच्या वादातून आपल्या सुनेची हत्या केली. ते म्हणाले की, मृत 35 वर्षीय महिला आणि तिची सासू या दोघी एकाच घरात राहत होत्या. मृत महिलेला दोन मुली असून पतीचा मृत्यू झाला आहे. या मृत महिलेचे मल्ली नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे महिलेच्या कुटुंबात सतत वाद होत असत.
मृत महिलेच्या सासूकडे एक मालमत्ता होती. आपली सून ही मालमत्ता तिच्या प्रियकराला देईल, त्यामुळे आपल्या नातवंडांवर अन्याय होईल. अशी भीती सासूला नेहमी वाटत असे. एके दिवशी काही कारणास्तव सासू आणि सूनेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या दरम्यान सासूने सुनेची हत्या केली. यानंतर तिने सुनेचे शीर कापून ते घेऊन पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आता पोलिसांनी सासूविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.


