नागपूर : शहरातील कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ड्रायव्हरच्या घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहारात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तलमले लेआऊटला राहणाऱ्या महेश वाढई नावाच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला.
स्वच्छंद आयुष्य जगण्यासाठी महेशच्या पत्नीनेच त्याच्या हत्येसाठी 40 हजारांची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं आहे.
महेश वाढई हे त्यांच्या राहत्या घरी रात्री झोपेत असताना त्यांचं डोकं अज्ञाताने चादरीखाली दाबून धरलं आणि दुसऱ्या मारेकऱ्याने महेशच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केला. महेशने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेले. यानंतर महेश वाढईला उपचारकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पोलिस तपासात असं निदर्शनास आलं की, महेश वाढईच्या पत्नीची वागणूक संशयास्पद वाटली होती. महत्वाचं म्हणजे, महेशवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नव्हती. मारेकऱ्यांना पकडण्यासाठीही तिनं कोणताच प्रयत्न केला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी तिची सखोल चौकशी केल्यानंतर, आपणच पतीच्या हत्येसाठी रोहित गावतुरे, महेश गेडाम यांना सुपारी दिल्याचं मिनाक्षीनं कबूल केलं. मीनाक्षीचा स्वच्छंदी स्वभाव आहे आणि यातूनच तिचे तिच्या पतीशी वाद होत होते. यामुळेच महेशचा काटा काढण्यासाठी मीनाक्षीने पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर हे मारेकरी सोमवारी दुपारी साकोलीहुन नागपुरात पोहोचले आणि मीनाक्षीच्या मदतीने तिच्या पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.