शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मेटेंच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. दरम्यान, मेटे यांच्य पार्थिवावर सोमवारी (१५ ऑगस्ट) बीड जिल्ह्यातील उत्तमनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तशी माहिती शिवसंग्रामच्या स्थानिक नेत्यांनी दिली आहे. आज (१४ ऑगस्ट) संध्याकाळपर्यंत विमानाने विनायकराव मेटे यांचे पार्थीव बीड येथे त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत मेटे यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन या ठिकाणी ठेवण्यात येईल. नंतर दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यविधीसाठी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते येणार आहेत, अशी माहिती शिवसंग्रमाच्या कार्यकर्त्यांनी दिली. याआधी आज विनायक मेटे यांचे पार्थीव मुंबईतील त्यांच्या वडाळ्यातील भक्तीपार्क येथील त्यांच्या घरी नेले जाणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी शिवसंग्रामचे कार्यकर्ते तसेच अन्य नेते जमत आहेत. दरम्यान, मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यासाठी पोलिसांची आठ पथकं नेमण्यात आली आहेत. तर दुसरीकडे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. रस्त्यांवर आपत्कालीन मदतीसाठी सरकारची काय योजना आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.