महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.३०:-भद्रावती तालुक्यातील गोरजा येथील नळयोजना मागील १२ वर्षांपासून धुळखात असून ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.सदर नळयोजना सन २००९ मध्ये मंजूर झाली. या योजनेकरीता गावातील तलावाच्या मागे विहीर खोदून गावाशेजारी मोठी टाकी बांधण्यात आली. गावातील रस्ते फोडून पाईपलाईनही टाकण्यात आली. त्यामुळे गावक-यांना आनंदही झाला होता. परंतू आता मात्र गावक-यांच्या आनंदावर प्रशासनाने पाणी फेरले आहे. गावात नळाद्वारे पाणी केव्हा येणार हाच प्रश्न गावक-यांना मागील १२ वर्षांपासून भेडसावत आहे. १२ वर्षापूर्वी बांधलेली टाकी केव्हा कोसळेल याचा नेम नाही. याबाबत गोरजा ग्राम पंचायतीचे सरपंच अरुण टेकाम आणि उपसरपंच श्रावणी प्रफुल घोरुडे वारंवार प्रशासनाकडे सदर नळयोजना चालू करण्याची विनंती करीत आहेत. परंतू अजुनही प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिले नाही. नळयोजना चालू करण्याकरीता ८ लाख रुपये डिमांड विद्युत वितरण कंपनीकडे जमा न केल्याने सदर योजना रखडली आहे. त्यामुळे सदर रकमेची डिमांड भरुन प्रशासनाने लवकरात लवकर ही नळयोजना सुरु करावी अशी मागणी सरपंच अरुण टेकाम आणि उपसरपंच श्रावणी प्रफुल घोरुडे यांनी केली आहे.