बुलडाणा : काल, ११ ऑगस्ट ला श्रावणी पौर्णिमेला देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. बहिणीने भावाला रक्षासूत्र बांधायचे आणि भावाने आयुष्यभरासाठी बहिणीच्या पाठीशी असल्याचा शब्द द्यायचा असा या सणाचा संदेश.. मात्र सण – उत्सवप्रिय आपल्या देशातल्या बुलडाणा जिल्ह्यात एक गाव असेही आहे जिथे रक्षाबंधन उत्सव साजरा केल्या जात नाही. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वान नदीच्या काठावर वसलेल्या गावात कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही. याउलट श्रावण पौर्णिमेचा दिवस या गावातील लोक काळा दिवस समजतात. ७ हजार लोकवस्तीच्या या गावात पालिवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे. ३३२ वर्षांपूर्वी राजस्थानच्या पाली प्रदेशातून हा पालीवाल समाज या गावात स्थलांतरित झाला. देशावर मुघल शासकांचे आक्रमण होत असताना मुघल शासक मोहम्मद गझनी याने पाली प्रदेशावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात या प्रदेशात मोठा नरसंहार झाला, रक्ताचे पाट वाहिले..या आक्रमणाच्या तडाख्यातून हे वाचले ते नागरिक देशाच्या विविध भागांत स्थलांतरित झाले..ज्या दिवशी हे हत्याकांड झाले तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा..!
पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकता दिन..
मुस्लिम शासकाने केलेल्या आक्रमणात अनेकांनी आपले सगेसोयरे गमावले. त्यानंतर व्यवसायानिमित्त हा पालीवाल समाज देशभर विखुरल्या गेल्या. श्रावणी पौर्णिमेला आपले बांधव मारले गेल्याने हा समाज रक्षाबंधन साजरा करत नाही. या दिवशी पाली समाजाचे लोक गावातील मंदिरात एकत्र येऊन आपल्या पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करतात..या दिवशी गावात कुणाच्याच घरी गोडधोड जेवण बनवल्या जात नाही.