महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.७:-येथील आयुध निर्माणीतील सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्यावर जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या रानगव्यांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, येथील आयुध निर्माणीतील सुरक्षा रक्षक राकेश रमेश पुल्लकवार(३९) हे गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रात्र पाळीतील कर्तव्य बजाविण्याकरीता आयुध निर्माणीत जात होते. चांदा चेक पोस्ट येथून आपल्या वाहनाने आयुध निर्माणीकडे जात असताना रस्त्यावर अचानक रानगव्यांचा एक कळप आला. त्या कळपातील रानगव्यांनी राकेश यांच्यावर शिंगांनी हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या छातीला व डोक्याला जबर मार लागला. हा प्रकार कर्तव्य बजावून घराकडे परत येणा-या एका सहका-याला कळला. लगेच त्याने इतरांना माहिती दिली. राकेश यांना तातडीने आयुध निर्माणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर शुक्रवारी सकाळी नागपूर येथील प्लाॅटिना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


