मुंबई : ‘करारा जवाब मिलेगा’ हा ‘राजनीती’ चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयीचा डायलॉग चांगलाच गाजला होता. सध्या मनसे हाच डायलॉग मारत विरोधकांना विशेषत: राष्ट्रवादीला इशारा देत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जी विधाने केली त्याला उत्तरसभेत कडक उत्तर दिले जाईल, असा टीझरच मनसेने व्हायरल केला. मनसेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सध्या एका टीझर व्हायरल केला जात आहे. ५९ मिनिटांच्या या क्लिपमध्ये करारा जवाब मिलेगाचा डायलॉग वाजतोय. या डायलॉगच्या मध्येच अजित पवार, संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे यांच्या भाषणावर टीका करणारी विधाने आहेत. या प्रत्येक विधानाची खिल्ली उडविली जाईल, अशा प्रको चित्रपटातील संवाद वापरला गेला आहे. तर, शेवटी राज ठाकरे यांच्या सभेतील क्लिप जोडत त्याला ‘करारा जबाव मिलेगा’ चा डायलॉग वापरला गेला आहे.
गुढीपाडवा मेळाव्यानंतरच्या टिकेला ठाण्यातील सभेतून उत्तर देण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून हा टीझर व्हायरल करण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र हा सर्व प्रकार आपली एकता खंडीत करण्याच्या एककलमी कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. राष्ट्रवादीची मुळे इतकी कमकुवत नाहीत की अशा धक्क्यांनी ती हलतील. बिनबुडाचे आरोप, षडयंत्र आणि खोदून खोदून राष्ट्रवादीवर चिखलफेक करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मनसे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.