तोहोगाव : दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा जीव जात आहे. दररोज शेतशिवार परिसरात वाघ हल्ले होत आहेत. कधी यात मनुष्यहानीही होत आहे. हे व्याघ्र हल्ले कधी थांबणार, असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत. तोहोगाव परिसरात जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाने आपला मोर्चा वेजगाव येथे वळविला आहे. रविवारी सकाळी १० वाजता आर्वी येथील जीवनदास गिरसावले यांच्या दोन म्हशींना वाघाने ठार केले, तर वेजगाव येथील नांदे यांचा बैल जखमी केला. वाघाच्या हल्ल्याची श्रुंखला सतत आठवडाभरापासून सुरूच आहे. परंतु अजूनही वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला व वन विकास महामंडळाला यश आले नाही.
रविवारी परत आर्वी येथील जीवनदास गिरसावले यांच्या दोन म्हशींना वाघाने ठार केले व वेजगाव येथील नांदे यांच्या बैलाला जखमी केले. तो वाघ नुकताच आपल्या आईपासून वेगळा झाला असून तो आता शिकार करीत आहे. मात्र, शिकार त्याला खायला मिळत नसल्याने तो वारंवार शिकार करीत आहे. हा वाघ तीन वर्षांचा नर वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
या दोन्ही घटनांचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक झाडे यांनी केला. १ एप्रिलला गोशाळेत शिरून वाघाने सहा जनावरांना ठार केले होते. या घटनेत काही जनावरे जखमीही झाली होती. ६ एप्रिलला गावाशेजारील गोठ्यात शिरून एक बैल ठार केला तर दुसरा जखमी केला होता. दुसऱ्याच दिवशी ७ एप्रिलला शेतात चरत असलेल्या संजय गिरसावले यांच्या बैलाला जखमी केले. ९ एप्रिलला आर्वी येथे चराईसाठी आलेल्या कुर्मावार यांच्या कळपात वाघ शिरला. यात सात शेळ्यांना वाघाने ठार केले. व तीन शेळ्या जखमी केल्या.