सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
औसा : तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार एस.एस. सावंत यांनी सुसाईड नोट लिहुन मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री किल्लारी पोलिस स्टेशनला नाईक कृष्णा गायकवाड, मीरा जाधव यांच्यासह पीएसओ कर्मचारी एस. एस सावंत हे ड्युटीवर होते. मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटाला सावंत यांनी ठाण्यात सीसीटीएनएस रूम मध्ये एसएलआर रायफल बट नंबर 248 च्या साहाय्याने हनुवटीच्या खालून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. हा आवाज ऐकून नाईक कृष्णा गायकवाड हे घटनास्थळी पोंहचले. सदरील घटनेची माहिती त्यांनी तात्काळ किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिली.किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदरील माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना कळवली. रात्री साडेतीन वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे हे किल्लारी पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते . याप्रकरणी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणेने सर्व व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावंत यांनी २०१७ मध्ये कासार शिरशी (ता.निलंगा) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना निलंगा तालुक्यातील काही शैक्षणिक संस्था चालक व काही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आर्थिक व्यवहार केले होते. स्वतःच्या खाजगी प्रॉपर्टी वर कर्ज उचलून त्यांनी ते बैठकीतल्या व्यवहारांमध्ये दिले होते. यांना जवळपास नऊ ते दहा लाख रुपये देणे होते. ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेला आहे. असे लोक रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी यासंदर्भात यापूर्वीही तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटी कर्ज काढून दुसऱ्याला दिलेले पैसे परत येत नसल्याने हतबल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. मयत एस.एस.सावंत हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील रहिवासी असून तेथे त्यांचे कुटुंब आहे. कुटुंबांमध्ये आई पत्नी व लहान तीन मुली आहेत. त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे शनिवारी सकाळी पोलीस स्टेशन समोर लहान मुलींसह महिलांचा आक्रोश सुरू होता. या ठिकाणी संपूर्ण गाव एकवटले होते. या घटनेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांना अश्रू अनावर झाले.याप्रकरणी सुसाईड नोटमध्ये नावे असलेल्या निलंगा तालुक्यातील शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्यांसह जवळपास सात लोकांच्या विरोधात फिर्यादी कडून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पवार, किल्लारी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, रंजीत काथवटे, ठाणे आमलदार गणेश यादव, बी.आर. बंन, सचिन उस्तुर्गे, गौतम भोळे, बाबा इंगळे यांच्यासह तालुक्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.याप्रकरणी सुसाईड नोटमधील काही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून इतरां बाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच उर्वरित व्यक्तींना ताब्यात घेऊ असं जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले आहे.











